बार्शी – निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक कामगार केंद्राच्यावतीने १९ ऑक्टोबर २०२६ रोजी बार्शीतील शिवसृष्टी येथे निदर्शन आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनावेळी कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांनी केंद्र सरकार, भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना आणि तिरंगा मान्य नाही. देश संविधानानुसार नव्हे, तर गोळवलकर यांच्या विचारधारेनुसार चालविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्गीय मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त करत, हा संविधानिक अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला. देशातील १३ कोटी लोकांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये मतदानाची चोरी करून भाजपने सत्ता मिळवल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले.
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपकडून विरोध होत असल्याचा उल्लेख करत, जनतेच्या दबावातून ज्ञानेश कुमार यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल, असे ठोंबरे म्हणाले. निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
या आंदोलनात आयटकचे जिल्हा सचिव कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, कॉम्रेड प्रवीण मस्तुद, लहू आगलावे, रशीद इनामदार, आनंद गुरव, भारत भोसले, प्रमोद मंडलिक, बालाजी शितोळे, भारत चव्हाण, लोकरे ताई, निर्मला सरवदे, भारती मस्तुद, आकाश कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 3