बार्शी – वकील संघाच्यावतीने सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात बार असोसिएशन हॉल, बार्शी येथे संपन्न झाला.
यावेळी बार्शी वकील संघाच्यावतीने आ. राजेंद्र राऊत यांना भारतीय संविधानाची प्रत भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली. संविधानातील लोकशाही मूल्ये, न्याय, समता आणि बंधुता या तत्त्वांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारा हा सन्मान विशेष लक्षवेधी ठरला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. राजेंद्र राऊत यांनी आपल्या मनोगतात बार्शीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच न्यायव्यवस्था, वकिली व्यवसाय आणि जनसामान्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य करण्याची ग्वाही दिली. बार्शी वकील संघाने व्यक्त केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमास बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रणजित गुंड, उपाध्यक्ष ॲड. अक्षय पाटील, सचिव ॲड. प्रकाश साखरे, खजिनदार ॲड. सुरज राऊत, लायब्ररी चेअरमन ॲड. अमोल अलाट यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ वकील, महिला वकील आणि मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम आनंदी, उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी मा. राजेंद्र राऊत यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.