
सोलापूर : माळढोक पक्षी अभयारण्य, नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे कार्यरत असलेल्या रोजंदारी वनमजुरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. वन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत मजुरांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी दि. ५ जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
वनमजुरांनी दिलेल्या निवेदनानुसार, अभयारण्यातील ‘ब्रेक सिस्टीम’ बंद करावी, सध्या कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम कामावर ठेवावे, ओळखपत्रे द्यावीत, विमा संरक्षण लागू करावे, शासन नियमानुसार युनिफॉर्म व रोजंदारी मिळावी, तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
मजुरांचे म्हणणे आहे की, माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र पूर्वी १,२५० हेक्टर होते. आता ते वाढून सुमारे ३,५०० हेक्टर झाले असतानाही मनुष्यबळ आणि सुविधांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. अनेक वनमजूर गेल्या १५ वर्षांपासून येथे सेवा बजावत असूनही त्यांना मूलभूत सुविधा आणि शासनाच्या नियमांनुसार मिळणारे लाभ अद्याप मिळालेले नाहीत.
दरम्यान, या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही वनमजुरांनी दिला आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.























