सोलापूर – नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (एन.ए.बी.) संचलित सुशीलकुमार शिंदे दिव्यांग (दृष्टीबाधित) औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आया. या वेळी दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी गायन, मनोगत आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या सादरीकरणातून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. या प्रसंगी ‘सी. सी. इन कॉम्प्युटर बेसिक’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मानधन देऊन गौरवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आयोजित गायन स्पर्धेत शुभम नरसाळे याने प्रथम, तर शिवशरण गडदुरे व दीपक चिंचोळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ‘उडान शिष्यवृत्ती’अंतर्गत तीन लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल हर्षद पुंडगे या गुणवंत विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करताना विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे व आत्मविश्वासाचे कौतुक केले. नगरसेवक नरसिंह आसादे यांनी विद्यार्थ्यांना सुशीलकुमार शिंदे यांचा जीवनप्रवास आणि सामाजिक-राजकीय योगदानाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (सोलापूर जिल्हा शाखा) चे सचिव शशीभूषण यलगुलवार होते. या प्रसंगी बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष आणि
एन.ए.बी.चे आजीव सदस्य पद्माकर कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे अधीक्षक रामचंद्र नंदकुमार कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन शिवकुमार पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन रियाज मुल्ला यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना सुगंधी दूध व खाऊचे वाटप करण्यात आले.
Post Views: 10