सोलापूर – बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूर आयोजित जिल्हास्तरीय लोककला महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करत हरीभाई देवकरण प्रशालेच्या समूहगीत गायन संघाने लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला ₹७,००० रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल हरीभाई देवकरण प्रशालेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार आणि शाळा समिती अध्यक्ष सुभाषबाबू मंकणी यांच्या हस्ते विजेते विद्यार्थी, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे आणि प्रशिक्षक सावनी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत गीतानंतर अर्चना अडसूळ यांनी प्रास्ताविक केले. सुभाष माने यांनी बालरंगभूमी परिषदेचे कार्य विशद करत विद्यार्थ्यांना मोफत सदस्यत्व घेण्याचे व प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सीमाताई यलगुलवार यांनी बालरंगभूमी हा बालकलाकारांच्या अभिव्यक्तीसाठी सदैव मंच उपलब्ध करून देणारा उपक्रम असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात सुभाषबाबू मंकणी यांनी विद्यार्थ्यांना शाळा समितीच्या वतीने दोन हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करून अभिनंदन केले.
याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा.ज्योतिबा काटे, सुभाष माने शाळेचे उपमुख्याध्यापक रवींद्र पानसरे, पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड, मारुती शहाणे, गणेश नेवरे, महेंद्र रणधीर यांच्यासह शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते