अकलूज – पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत अकलूज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई केली आहे. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास करत घरफोडी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे १० लाख १२ हजार २२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकलूज पोलीस ठाणे गु.र.नं. ४५३/२०२६ अन्वये दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात संशयितांचा शोध घेतला जात होता. तपासादरम्यान सागर दिलखुश काळे (वय ३६, रा. जळोली, ता. पंढरपूर), आकाश उर्फ पप्पया संभाजी चव्हाण (वय ३५, रा. पडसतळ, ता. पंढरपूर) आणि सुरज उर्फ दया रवि चव्हाण (वय २४, रा. पडसतळ, ता. पंढरपूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी नेवरे, यशवंतनगर व रूपननगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. चोरी केलेले सोन्याचे दागिने करकंब येथील श्रीराम गोल्ड व सिल्वर पॅलेस येथील मालकांकडून विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे ९ लाख ८२ हजार २२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याशिवाय अकलूज नवीन बसस्थानक येथे बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतून पर्स काढून त्यातील सोन्याचे लक्ष्मीहार व अंगठी असा सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणातही संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अकलूज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, सीडीआर अॅनालिसिस आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली.
या कारवाईनंतर तिघा आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवडे, अपर पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग प्रेरणा कट्टे आणि अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस हवालदार विनोद साठे, शिवकुमार मदभावे , राहुल रणगावे, तुषार गाडे, दत्तात्रय खरात, अनुराधा आडगळे, पोलीस कॉन्स्टेबल सोमणाथ माने, पंडित गवळे, तुकाराम माने-देशमुख, विजय नटके तसेच सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.
Post Views: 9