सोलापूर – भावनाऋषी पेठ, जुन्या वालचंद कॉलेजसमोरील श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त दाक्षिणात्य मंदिर परंपरेचा तेजोमय, दिव्य आणि चैतन्यमय सोहळा अपार भक्तिभावात व अद्भुत उत्साहात संपन्न झाला.
रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या तोरणांच्या, केळीच्या झाडांचे तोरणांनी पहाटेच्या पवित्र ब्रह्ममुहूर्तावर मंगल वाद्यांच्या निनादात गुंजलेल्या सुप्रभातम् आणि वैदिक ऋचांच्या मंगल घोषात पार पडलेले षोडश रूद्राभिषेकम् हे जणू भक्तांच्या अंतःकरणातील श्रद्धेला जागृत करणारे ठरले. त्यानंतर सुगंधित पुष्पमालांनी, रत्नखचित अलंकारांनी सजवलेल्या पाळण्यात बाल हनुमंताचा जन्मोत्सव अत्यंत भावमधुर वातावरणात साजरा करण्यात आला. महिला भगिनींनी सादर केलेल्या कोमल अंगाई गीतांनी मंदिर परिसर भक्तिरसात पूर्णतः ओथंबून गेला.
अलंकार सेवेत पंचमुखी हनुमानाचे तेजस्वी, दिव्य व अलौकिक स्वरूप पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले, तर दिव्य दर्शनम् साठी भाविकांची अखंड रांग लागली होती.
यानंतर झालेल्या १०८ संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठणाने संपूर्ण परिसर “जय श्रीराम” आणि “हनुमान” नामघोषाने अक्षरशः दुमदुमून गेला. गदा पूजनम् विधीने हनुमंताच्या अद्वितीय पराक्रम, भक्ती आणि रक्षणशक्तीची जाणीव प्रत्येक भक्ताच्या मनात दृढ झाली.
समाजसेवेचा दैवी संदेश देत आयोजित रक्तदान शिबिरात युवकांसह युवतींचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. विशेष म्हणजे, आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या सुविद्य पत्नी मोनिकाताई कोठे यांनीही रक्तदान करून समाजाप्रती असलेली निष्ठा आणि बांधिलकी अधोरेखित केली.
याच पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य रथयात्रा हे सोहळ्याचे शिखर आकर्षण ठरले. दाक्षिणात्य मंगल वाद्यांच्या गजरात आणि “जय श्रीराम”च्या अखंड घोषात वातावरण भक्तिमय झाले. सुबक नक्षीकाम केलेल्या भव्य लाकडी रथात विराजमान पंचमुखी हनुमानाची दिव्य मूर्ती तसेच पंचमुखी पाच अवतारांचे तेजस्वी स्वरूप मंदिर परिसरातील प्रमुख मार्गांवरून मिरवण्यात आले.
या शोभायात्रेत बाल वानरांनी रथ ओढत साक्षात भक्तीचे रूप साकारले, तर वनवासी रूपातील व राज्याभिषेकातील राम-लक्ष्मण-सीता-हनुमान वेषातील बालकांनी उपस्थितांची मने जिंकली. उंट-घोड्यांची शान, पारंपरिक वेशातील स्वयंसेवक, भगवे फेटेधारी भक्त व पताकाधारींची उपस्थिती यामुळे रथयात्रेला अद्वितीय भव्यता प्राप्त झाली.
ढोल-ताशे, बॅन्ड व दाक्षिणात्य वाद्यांच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला. प्रत्येक क्षणी भक्तिभाव, उत्साह आणि संस्कृतीचा मिलाफ अनुभवायला मिळत होता. हनुमान भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या सोहळ्याला केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक वैभवाचीही दिव्य झळाळी प्राप्त झाली.

















