सोलापूर – जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता उंचावण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथे झालेल्या अचानक तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दोन शाळांच्या तपासणीत मुख्याध्यापक गैरहजर, आवश्यक नोंदी अपूर्ण, तसेच विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील कमी प्रमाणात आढळून आले आहे. यांसह शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतही त्रुटी आढळल्याने शिक्षण विभागातील शिस्त आणि जबाबदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार तसेच शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना नियमित शाळा तपासणी करून शिस्तबद्ध कामकाज सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आता या सूचनांना आता हरताळ फासलेला दिसत आहे. बोगस शाळा, बोगस विद्यार्थी संख्या, कामकाजातील त्रुटी त्यानंतर कहर म्हणजे शाळांमध्ये विद्यार्थ्यां ऐवजी मुख्याध्यापक व शिक्षकांनीच दांड्या मारल्याचे तपासणीत प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जमादार यांनी शनिवारी देगाव येथील पीएमश्री शाळा आणि मुलांची जिल्हा परिषद शाळा यांना अचानक भेट दिली. तपासणीदरम्यान पीएमश्री शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत लांबे यांनी मस्टरवर स्वाक्षरी केली असली, तरी हालचाल नोंदवहीत कोणतीही नोंद न करता शाळेतून निघून गेल्याचे आढळले.
यानंतर मुलांच्या शाळेच्या तपासणीत मुख्याध्यापिका रूपाली शेलार या २२ जूनपासून शाळेत अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे त्यांच्या अनुपस्थितीबाबत गटशिक्षण कार्यालयाकडे कोणताही रजा अर्ज सादर करण्यात आलेला नव्हता. तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत धान्य व इतर साहित्य निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त शिल्लक असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल शिक्षण विस्तार अधिकारी जमादार यांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे सादर केला असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून नियमानुसार कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
सोलापूर शहरालगतच्या जिल्हा परिषद शाळांमध्येच अशी परिस्थिती आढळत असल्याने दुर्गम भागातील शाळांमध्ये प्रत्यक्ष स्थिती काय असेल, याबाबत शिक्षण विभागात चर्चा सुरू झाली आहे. गुणवत्ता वाढीसाठी सुरू झालेल्या मोहिमेत आता नियमित तपासणी, शिस्तबद्ध कामकाज आणि जबाबदारी निश्चितीला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोट
कारवाईची शिफारस
शाळा तपासणी शाळेतील मुख्याध्यापक गैरहजर आढळून आले. गटशिक्षणाधिकाऱ्याकडे अहवाल पाठवला आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाईचे शिफारस करण्यात आली आहे. याबाबतीत सोमवारी निर्णय होईल.
– उमेश जमादार, शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 8