जेऊर – गावच्या यात्रेत डी.जे , अश्लील हावभाव नृत्य व ध्वनी प्रदूषणास बंदीसाठी झरे ता करमाळा या गावातील महिला सरसावल्या असून यासंबंधीचे निवेदन त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा , तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचेसह महिला बालविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
झरे गावची यात्रा दोन एप्रिल रोजी होणार आहे गेल्या काही वर्षांपासून या यात्रेमध्ये डीजे लावला जातो व अश्लील नृत्य केले जाते हे बंद करण्यासाठी गावातील महिला सरसावल्या असून त्यांनी या संबंधीचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की ही जोतिबा यात्रा ही धार्मिक व पारंपरिक स्वरूपाची असून गावाच्या श्रद्धेचा अत्यंत संवेदनशील विषय आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून या यात्रेमध्ये उघडपणे अश्लील नृत्य, अश्लील गाणी आयोजित केले जात आहेत. हे प्रकार सार्वजनिक ठिकाणी उघडपणे घडत असून ते समाजातील नैतिक मूल्ये, महिलांचा सन्मान व सार्वजनिक शिस्त यांना बाधा आणणारे आहेत.
तसेच डी.जे. च्या माध्यमातून प्रचंड ध्वनिप्रदूषण निर्माण केले जात असून, यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रास सहन करावा लागतो आहे. वरील प्रकार हे भारतीय दंड संहिता तसेच ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणारे असून, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे आहेत. म्हणून आपणास नम्र विनंती करण्यात येते की अश्लील नृत्य व अशा प्रकारच्या कार्यक्रमांना तात्काळ परवानगी नाकारण्यात यावी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावीडी.जे. व ध्वनिप्रदूषणावर कायदेशीर मर्यादानुसार कडक नियंत्रण ठेवण्यात यावे यात्रेदरम्यान पुरेशा पोलीस बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी.आपण या बाबीकडे तात्काळ व गंभीरतेने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गावच्या संस्कृतीसाठी या रणरागिणी सरसावल्या
सरपंच मंजुश्री मुसळे
वैशाली काळे, अश्विनी सरोदे ,रेशमा सरोदे,स्वाती पाटील,सैरंद्रा मोरे,मंगल ढावरे ,अलका मोरे यांच्यासह 135 महीला व ग्रामस्थांच्या सहया निवेदनावर केलेल्या आहेत.
यात्रा कमिटीचे सहकार्य
या उल्लेखनीय कार्यात यात्रा कमिटीने मोलाचे सहकार्य केले आहे. त्याच बरोबर गावातील सुजान नागरिक सर्व राजकीय नेते यांनीही सहकार्य केले आहे


















