सोलापूर : जगदगुरु श्री मन्ममध्वाचार्य मूलमहासंस्थान श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालय सोलापूर शाखेतर्फे प्रतिवर्ष होणाऱ्या श्री राघवेंद्रस्वामी आराधना महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मध्याराधनेनिमित्त रविवारी दुपारी १२ वाजता प्रयुक्त लक्ष पुष्पार्चन व तुळशी अर्चना करण्यात आली.
मुरारजी पेठ येथील श्री राघवेंद्र स्वामी मठात आणि श्री काळजापूर मारुती मंदिराशेजारील श्री राघवेंद्र स्वामी मठात रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक कार्यक्रमानंतर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सोलापुरात होणाऱ्या आराधना महोत्सवाचे यंदाचे ५२ वे वर्ष आहे. मंत्रालयम येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीपती श्री श्री १०८ श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांच्या आज्ञेनुसार श्रावण वद्य प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया या तीन दिवसांमध्ये हा आराधना महोत्सव होत आहे.
रविवारी प्रयुक्त लक्ष पुष्पार्चन व तुळशी अर्चना झाल्यानंतर सोमवारी श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवाचा समारोप होणार आहे. सोमवारी उत्तराराधना करण्यात येणार आहे. यात पहाटे ५.३० वाजता सुप्रभात, सकाळी ६ वाजता निर्माल्य विसर्जन, सकाळी ७.३० वाजता अष्टोत्तर पारायण, सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक, सकाळी ११ वाजता तुळशी अर्चना व नैवेद्य, हस्तोदक, अलंकार, महामंगलारती व तीर्थप्रसाद हे कार्यक्रम होणार आहेत. तसेच सोमवारी सकाळी ११ वाजता श्री राघवेंद्र नगरातून महारथोत्सव होणार आहे. श्री काळजापूर मारुती मंदिराजवळील मठात सोमवारी पालखीसेवा देखील होणार आहे.
मुरारजी पेठ येथील श्री राघवेंद्र स्वामी मठात सकाळी प्रवचन आणि भजनही होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री राघवेंद्र स्वामी मठातर्फे करण्यात आले आहे.






















