पंढरपूर – शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या प्रदक्षिणा मार्गावरील बंकट स्वामी मठाशेजारील स्वामी यांच्या घराला आणि घराच्या खालील बाजूस असलेल्या दुकानाला गुरुवारी दुपारी अचानक मोठी आग लागली. आगीमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे दिसून येताच नागरिकांनी घटनेची माहिती अग्रिशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझविण्याचे काम सुरू केले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात
नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
————
चौकट : (चमकोगिरी करणाऱ्या समाजसेवकांकडून व्यत्यय)
सोशल मीडियावर आपले चित्रीकरण प्रसिद्ध व्हावे, या उद्देशाने काही जण अग्निशमन दलाच्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला.आपत्कालीन परिस्थितीत अग्रिशमन दलाला काम करण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असताना अशा प्रकारे अडथळा आणणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Post Views: 4