सोलापूर : एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी सौरभ संजय पाताळे(वय २१ वर्ष, रा.घर क्र.५४६ उत्तर कसबा, सोलापुर) यास न्यायाधीश जे.जे.मोहिते यांनी ३ महिन्यांची साधी कैद व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांची कैद भोगावी लागणार आहे.
गुन्ह्याची थोडक्यात पार्श्वभूमी – दि. १४ मार्च २०२० रोजी सकाळी अल्पवयीन मुलगी वय १७ वर्षे ८ महिने, ही संगमेश्वर कॉलेज, सातरस्ता येथे अकाउंटचा पेपर देण्यासाठी गेली होती. पेपर संपल्यानंतर ती घरी परत न आल्याने तिच्या आई-वडिलांनी तिचा नातेवाईक व मैत्रिणींकडे शोध घेऊन तिच्याकडून माहिती घेतली असता, वरील आरोपी हा तिच्याशी कॉलेजमध्ये ओळख वाढवून तिच्याशी जवळीक साधत असल्याचे तसेच तिचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध सदर बझार येथे भादंवि कलम ३५४ व पोक्सो कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा तपास सपोनि चानकोटी यांनी केला. तपासादरम्यान संबंधित साक्षीदारांचे जबाब, उपलब्ध कागदपत्रे व इतर पुरावे संकलित करून तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रकरणातील जबाब व तपास कागदपत्रांमध्ये असलेल्या तथ्यांच्या आधारे न्यायाधीश जे.जे.मोहिते यांनी आरोपी सौरभ पाताळे यास वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ऍड.कविता बागल यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणुन पोलीस हवालदार प्यारन नदाफ यांनी काम पाहिले व दोषसिद्धी कक्षाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश डाकेवाड, फौजदार रामु मुददे, हवालदार मैंदाड यांनी कामकाज पाहिले.
Post Views: 4