सोलापूर : राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या अभ्यासू आणि प्रभावी कार्याची छाप उमटविणाऱ्या शिवसेना खासदार डॉ. ज्योती नागनाथ वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताच्या संसदीय कार्य मंत्रालयाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. सोलापूरच्या दृष्टीने ही अभिमानाची आणि आनंदाची बाब मानली जात आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीचे अधिकृत पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. ज्योती वाघमारे यांनी स्वीकारले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. वाघमारे यांच्या कार्याचे कौतुक करत महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्या राष्ट्रीय पातळीवर प्रभावी योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.
पहिल्याच अधिवेशनानंतर मिळालेली ही राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी डॉ. ज्योती वाघमारे यांच्या कार्याची आणि अभ्यासू नेतृत्वाची पावती मानली जात असून, त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूरसह राज्यातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




















