धाराशिव : जिल्ह्यात यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिल्याने प्रमुख खरीप पीक असलेले सोयाबीन संकटात सापडले आहे. पाण्याअभावी अनेक भागांतील सोयाबीन पीक करपण्याच्या स्थितीत असून, त्यातच विविध रोगराईचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पीक पाहणी, पंचनामे, रोग नियंत्रण आणि आर्थिक मदतीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात सुमारे चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. मात्र, पावसाने दिलेली ओढ आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. काही भागांत रोगराईचा प्रादुर्भावही वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सोयाबीन पिकाची तालुकानिहाय व गावनिहाय तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत. पावसाअभावी बाधित झालेल्या क्षेत्राची वस्तुनिष्ठ नोंद करून शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई व मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सोयाबीनवरील रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने तातडीने विशेष मोहीम राबवावी. कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून गावोगावी प्रत्यक्ष मार्गदर्शन शिबिरे घेऊन रोग नियंत्रण, योग्य फवारणी, पीक व्यवस्थापन आणि उपलब्ध पर्यायी उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना द्यावी.
तसेच आवश्यक कीटकनाशके, बुरशीनाशके व इतर कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना योग्य दरात आणि वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशीही मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे.
बाधित क्षेत्राची माहिती तातडीने शासनाकडे सादर करून विशेष आर्थिक मदत तसेच दुष्काळसदृश परिस्थितीत मिळणाऱ्या सवलतींसाठी प्रस्ताव पाठवावा. कृषी विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाची संयुक्त यंत्रणा सक्रिय करून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सोयाबीन पिकाचे नुकसान म्हणजे केवळ शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान नसून त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नावर होणारा मोठा आघात आहे. त्यामुळे प्रशासनाने कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे.




















