सोलापूर : श्रीक्षेत्र शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी लष्कर परिसरातील जगदंबा चौक येथे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण, पुष्पवृष्टी, टाळ-मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात परिसर भक्तिमय झाला.
यावेळी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत राज्यात सुख, शांती, समृद्धी, सामाजिक ऐक्य नांदो, बळीराजावर वरुणराजाची कृपा व्हावी, शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळावे तसेच प्रत्येक कुटुंब निरोगी व आनंदी राहावे, असे साकडे घातले.पालखी आगमनावेळी त्यांनी महिलांसमवेत टाळ-मृदुंगाच्या गजरात फुगडी खेळत वारकरी परंपरेतील भक्तीभाव अनुभवला. “गण गण गणात बोते” आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला.
शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी नगरसेविका कल्पना कदम, दीपक पाटील, अविनाश जाधव, धनंजय पाटील, मोहन नारळे, दिनेश लोणार, भैय्या माने, प्रशांत लोणार, हुलजनतीवाले, मंगेश जंगडेकर, गणेश तुपदोळे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा संगम घडविणारा हा पालखी सोहळा उत्साहात पार पडला.
Post Views: 14