सांगोला – फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. मैदानावर विजयासाठी केलेली मेहनत, पराभवातून शिकण्याची वृत्ती, संघातील प्रत्येक सहकाऱ्याला सोबत घेण्याची भावना आणि नियमांचे पालन करण्याची सवय विद्यार्थ्यांच्या आयुष्यालाही नवी दिशा देते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत विविध क्रीडा प्रकारांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करत विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील प्रतिभेला चालना मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास प्राचार्य सिकंदर पाटील, डॉ.संगिता स्वामी, अभिनंदन टाकळे, संजय देशमुख, क्रीडाशिक्षक पंचाक्षरी स्वामी, आरिफ तांबोळी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचाक्षरी स्वामी तर आभार आरिफ तांबोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 11