पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये शिक्षण, नोकरी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी व तरुण पीजी, हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहेत. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात भोजन पुरवले जात असले तरी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि पोषणमूल्यांबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित होत असतात.
राज्यात अन्न सुरक्षेसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी प्रभावी कारवाया सुरू असून निकृष्ट व भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कठोर कारवाई केली जात आहे. या मोहिमेमुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होत असून सुरक्षित अन्नाचा हक्क अधिक बळकट होत आहे.
तथापि, मेस पीजी, हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे व नोकरदारांचे दैनंदिन आरोग्यही भोजन व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
अनेक तरुण घरापासून दूर राहत असल्याने त्यांना उपलब्ध होणाऱ्या अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता याबाबत नियमित पडताळणी होणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन, स्वच्छ स्वयंपाकगृह, शुद्ध पिण्याचे पाणी, अन्नपदार्थांची साठवणूक आणि भोजन तयार करण्याच्या प्रक्रियेची वेळोवेळी तपासणी झाल्यास विद्यार्थी व पालकांमध्ये अधिक विश्वास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पीजी, हॉस्टेल आणि मेस यांच्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
———-
चौकट १
का महत्त्वाचा आहे हा विषय?
पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि इतर प्रमुख शहरांमध्ये शिक्षण व नोकरीसाठी लाखो विद्यार्थी आणि तरुण पीजी, हॉस्टेल व मेसमधील भोजन व्यवस्थेवर अवलंबून आहेत. या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता सुनिश्चित झाल्यास मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.
Post Views: 20