माढा : माढा ग्रामीण रुग्णालयात १एप्रिल २०२५ रोजी एक महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. ती महिला प्रसुती झाल्यानंतर त्या महिलेच्या पतीकडून व तिच्याकडून ती वास्तव्यास असलेल्या वार्ड व स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतल्याचा व्हिडिओ महिलेच्या पतीकडून व्हायरल झाला होता. हे प्रकरण काही लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व प्रसारमाध्यमांनी ताकतीने लावून धरत आरोग्य विभागाला याचा जाब विचारल्यामुळे यावर आरोग्य भागाच्या वरिष्ठांनी उशिरा का होईना १४ महिन्याने संबंधित नऊ कर्मचाऱ्यांना एकाच वेळी निलंबित केले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या निलंबनाच्या कारवाईमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांचा देखील समावेश आहे.
जिल्ह्याच्या आरोग्य विभागात एकाच वेळी नऊ कर्मचाऱ्यांवर झालेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा हलगर्जीपणा होत असेल तर त्या ठिकाणचे यंत्रणा या कारवाईमुळे नक्कीच खडबडून जागी झाली असणार हे नाकारता येणार नाही.
या प्रकरणाची मिळालेली माहिती अशी आहे की माढा तालुक्यातील खैराव येथील हेमा शैलेश धडे (वय ३०) या १ एप्रिल २०२५ रोजी प्रसूतीसाठी माढा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्या त्याच दिवशी रात्री सिझर प्रसूती झाल्या. त्यामुळे त्या तेथे वास्तव्यास होत्या या कालावधीत त्यांचे पती व त्यांच्याकडून वॉर्ड व स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आला असता सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी संबंधित विभागाला याचा जाब विचारला होता. तसेच प्रसार माध्यमांनी देखील याची दखल घेत वर्तमानपत्र व चॅनलने बातम्या प्रसिद्ध केल्याने शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे व आमदार अभिजीत पाटील यांनी यात लक्ष घालत आरोग्य विभागाला धारेवर धरत जाब विचारला होता. परिणामी या प्रकरणाची आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संथगतीने का होईना चौकशी करून कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत संबंधित नऊ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
चौकट….
निलंबनाची कारवाई झालेले कर्मचारी –
वैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास मेमाणे,दिव्या गवळी,स्मिता जमदाडे , चंद्रकांत गोयर, सौदागर जाधव, सत्यजित राठोड, शुभम डाकूलवार, भरत कोटीयाना,स्वप्निल जाधव
चौकट….
माढा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत आरोग्य विभागाने संथगतीने का होईना कारवाई केली त्याचे आम्ही स्वागत करतो. ही घटना घडून १४ महिने झाले या प्रकरणात कारवाईस इतका उशीर का ? ही बाब पण तितकीच लक्षवेधी आहे. याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
या प्रकरणात कुणाला अभय देण्याचा प्रयत्न तरी नव्हता ना याचीही पडताळणी झाली पाहिजे. ग्रामीण रुग्णालय हे गोरगरीब जनतेसाठी उभारले गेले आहे. त्या ठिकाणी आलेल्या रुग्णांना तेथील कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी घेऊन सेवा देत कर्तव्य बजावणे गरजेचे आहे. यापुढे अशा गोष्टी घडल्या किंवा निदर्शनास आल्या तर ते आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास नक्कीच आणून देऊ व संबंधितावर तात्काळ कारवाईसाठी आंदोलन करू.
शंभू साठे,
सामाजिक कार्यकर्ते माढा.