सोलापूर – मंद्रूपमध्ये १९९१ मध्ये हद्दवाढ भाग वाढला. तेव्हापासून हद्दवाढ भागात कोणत्याच सोईसुविधा नसल्याने नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाणीपट्टी व घरपट्टीसह इतर कर भरण्यात अग्रेसर असणार्या नागरीकांना सोईसुविधांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे . सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांचे हद्दवाढ भागातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थलांतरीतांच्या प्रमाणात वाढ होत आहे. हद्दवाढ भागात सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी व सिईओ यांचे आदेश असतानाही सत्ताधार्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मंद्रूपमध्ये विठाई नगर, बाबूलाल नगर, संजय नगर, देशमुख नगर, इंदिरा नगर, समर्थ नगर यासह इतर अनेक नगरांची निर्मिती झाली आहे. या नगरमध्ये सांडपाणी, दिवाबत्ती, मुरूमीकरण, नळ पाणीपुरवठा, खड्डेमय रस्ता, अतिक्रमण, रस्ते बंद अशा अनेक समस्या आहेत. या समस्यांबद्दल ग्रामपंचायतकडे वारंवार पत्र व्यवहार करून व निवेदन देऊनही ग्रामपंचायतीकडून कोणत्याच सोईसुविधा मिळत नाहीत. त्यामुळे नोकरदार नागरीक सोलापूर शहराकडे धाव घेत आहेत.
हद्दवाढ भागातील ग्रामपंचायत सदस्य नागरीकांच्या तक्रारीबद्दल मूग गिळून गप्प असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणून हद्दवाढ भागाच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
…
…
उपसरपंचाच्या विधानाबद्दल आश्चर्य
….
जिल्हा परिषद निवडणूकीत मंद्रूपचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच भगवान व्हनमाने यांनी कोरे घराण्याशी ६० वर्षे ऐकनिष्ठ असल्याचे सांगत सर्व सोईसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. मात्र उपसरपंचांच्या वाॅर्डातील विठाई नगरमध्येच मोठ्या प्रमाणात समस्या असल्याचे दिसून येते. त्यामुळे उपसरपंच यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार ? दीड वर्षानंतर ग्रामपंचायत निवडणूक होणार असून यावेळी हद्दवाढ भागातील नागरीकांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
….
सत्ताधारी व विरोधकांची भूमिका गुञदस्त्यात
…
हद्दवाढ भागातील नागरीकांमुळे मोठ्या प्रमाणात कर जमा होते. या करामधून हद्दवाढ भागाच्या समस्या सोडविणे अपेक्षित असताना सत्ताधारी व विरोधक हद्दवाढच्या विकासाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे हद्दवाढच्या समस्या कधी सुटणार ? वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्षच होत असल्यामुळे नागरीकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत समस्या सोडविणार्यांनाच साथ देणार आहे.
जावीद आवटे, तालुकाध्यक्ष,
अखिल भारतीय किसान सभा


























