सोलापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सम्राट चौकातील श्री सद गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात परमपूजनीय श्री इनामदार गुरुजी यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी दुपारी १२ वाजता भक्तिमय वातावरणात गुलाल अर्पण करण्यात आला.
मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने नटला होता. वैशाख शुद्ध दशमी निमित्त रविवारी सकाळी धार्मिक विधी, गुरुगीता पारायण तसेच सकाळी ११ ते १२ या वेळेत भजनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर दुपारी १२ वाजता गुलालाचा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. “राजाधिराज सद गुरुनाथ इनामदार गुरुजीं की जय, जय रघुवीर समर्थ” असा जयघोष झाल्यानंतर हजारो भाविकांनी गुलाल व पुष्प अर्पण केले. या कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुलाल कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यामध्ये वांग्याची भाजी व खिरीचा समावेश होता. यासाठी सुमारे सव्वा क्विंटल वांग्याची भाजी तसेच एक क्विंटल खीर तयार करण्यात आली होती. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.
या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. यावेळी चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंतराव बंडगर, वामनराव वाघचौरे, कार्यकारणी मंडळातील सदस्य सुभाष बद्दूरकर, रवी गुंड, सम्राट राऊत, रमेश देशमुख, प्रभाकर कुलकर्णी, रामभाऊ कटकधोंड, परशुराम व्हटकर, वेदांत कुलकर्णी, दत्तात्रय कुसेकर, प्रकाश कोथिंबीरे, मंदिराचे व्यवस्थापक निरंजन दंतकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


























