पंढरपूर – पंढरपूरला भूवैकुंठनगरी म्हणून देखील संबोधले जाते. त्यामुळेच जर येथे मृत्यू आल्यास मोक्ष प्राप्ती होत असल्याची भावना लाखो हिंदू भक्तात आहे. पण दुर्दैवाने सध्या येथे मृत्यू झालेल्या मृतदेहाच्या तोंडात घालण्यास पाणी देखील उपलब्ध नसल्याने डबक्यासदृश्य चंद्रभागेचे घाणपाणी मृतदेहांच्या तोंडात टाकायची वेळ आलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून येथील वैकुंठ स्मशानभूमीत असणारा एकमेव हातपंप बंद अवस्थेत आहे.
त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणारे नागरिक मृतदेहाला शेवटचे पाणीही पाजू शकत नाहीत. अशावेळी मृतव्यक्तीच्या नातेवाईकांना चक्क नदीचे घाण पाणी आणून मृतदेहाच्या तोंडात टाकायची वेळ आलेली आहे. दरम्यान याबाबत आता येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम शिरसट आक्रमक झाले असून तातडीने वैकुंठ स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची सोय करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा पालिका प्रशासनाला त्यांनी दिला आहे.
जर मृतदेहालाच पाणी मिळत नाही तर जिवंत नागरिकांना कुठून मिळणार? यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरिक ही आता नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संतप्त होऊ लागले असून बाकी सर्व सोडा किमान मृतदेहाला शेवटचे पाणी पाजायची तरी व्यवस्था करा अशी संतप्त मागणी मृताचे नातेवाईकांकडून केली जात आहे.
नागरिकांच्या दुखावल्या जातात भाववना – शिरसट
बंद पडलेले हात पंप सुरू करून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करावे अन्यथा नगरपालिके विरुद्ध मोठे आंदोलन उभा करण्याचा इशारा शिरसट यांनी दिला आहे. सध्या नदीचे घाण पाणी मृतदेहांना द्यावे लागत असून यामुळे नागरिकांच्या भावनाही दुखावल्या जात असल्याचे शिरसाट यांनी सांगितले आहे. किमान आता तरी अंत्यसंस्काराला आलेल्या नातेवाईक आणि मृतदेहाला पाण्याची सोय नगरपालिकेने तातडीने करावी.
———-
राज्य सरकारकडून मिळतो कोट्यावधीचा निधी
वर्षाकाठी नगरपालिकेला राज्य सरकारकडून कोट्यावधीचा यात्रा निधी मिळतो आहे. अशावेळी किमान स्मशानभूमी तरी पाण्याची मूलभूत सुविधा द्यावी अशी संतप्त मागणी नागरिकातून येत आहे. या प्रकारामुळे धार्मिक आणि सामाजिक स्तरावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
————
अपमानास्पद परिस्थितीचा सामना
पंढरपूर सारख्या पवित्र स्थळी अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील प्रक्रियेत मूलभूत सुविधा नसणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. दररोज अनेक मृतदेह येथे आणले जात असताना, पाण्याअभावी कुटुंबीयांना होणारा मानसिक त्रास अधिकच वाढत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
———–
दरम्यान, या प्रश्नावर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटना एकत्र येत आंदोलनाची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची सोय करावी, तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून आता जोर धरू लागली आहे.
———–
येथील रवी वनारे यांच्या कुटुंबातील एक लहान मुलाचा नुकताच मृत्यू झाला. त्यानंतर त्याला पाजण्यासाठी येथील स्मशानभूमीत पाणीही इथे उपलब्ध नव्हते. दरम्यान अशीच प्रतिक्रिया येथील विजय मोरे यांनी बोलून दाखवित पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.


























