बार्शी – बार्शी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार दि. ३० जून रोजी कै. भाऊसाहेब झाडबुके स्मारक सभागृहात पार पडली. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांनी कामकाज पाहिले. यावेळी मुख्याधिकारी तैमुर मुलाणी उपस्थित होते. मात्र, विषयपत्रिकेवरील ४० विषयांपेक्षा शहरातील तीव्र पाणीटंचाईचाच प्रश्न सभागृहात सर्वाधिक गाजला. ९० मिनिटांच्या कामकाजापैकी तब्बल ५२ मिनिटे पाणीप्रश्न व इतर विषयांवर चर्चा झाली, तर उर्वरित ३८ मिनिटांत विषयपत्रिकेवरील सर्व ४० विषयांना मंजुरी देण्यात आली.
कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी अध्यक्षांची परवानगी घेऊन विषयपत्रिकेत नसतानाही शहरातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी आणि प्रशासन विरोधकांचे ऐकत नसल्यामुळे सभागृहातच हा प्रश्न मांडावा लागत आहे, असे सांगत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
यावर उत्तर देताना जलदाय अभियंता अजय होनखांबे यांनी नेहमीप्रमाणेच वीज व पाईपलाईन गळतीचे कारण देत उजनी धरणातील अपुरा पाणीसाठा, चांदणी तलावातून बंद झालेला पाणीपुरवठा यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगितले. बार्शी शहराला दररोज अडीच कोटी लिटर पाण्याची गरज असताना उजनी धरणातून केवळ ९० लाख लिटर पाणी उपलब्ध होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मात्र, या उत्तरावर अक्कलकोटे यांनी आक्षेप घेत, दररोज ९० लाख लिटर पाणी उपलब्ध होत असेल तर चार दिवसांत ३ कोटी ६० लाख लिटर पाणी मिळते. अशा परिस्थितीत नागरिकांना नियमित चार दिवसाआड पाणी मिळायला हवे. प्रत्यक्षात अनेक भागांत १० ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, असे सांगत प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावेळी नगरसेवक ज्योतिर्लिंग (बाप्पा) कसबे यांनी नागरिकांना १०-१५ दिवस पाणी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत असल्याचे सांगत, चालू वार्षिक पाणीपट्टीत ५० टक्के कपात करुन, ५० टक्केच पाणीपट्टी आकारण्याची आग्रही मागणी केली.
सत्ताधारी पक्षाचे विजय राऊत यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना, उजनी धरणातील कमी झालेला पाणीसाठा, चांदणी येथील बंद झालेला पुरवठा आणि नैसर्गिक अडचणींमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. समांतर उजनी जलवाहिनीचे काम सुरू असून चारपदरी रस्त्याच्या कामामुळे काहीसा विलंब झाला आहे. आम्ही कोणत्याही प्रभागात विकासकामांमध्ये भेदभाव करत नाही, असे स्पष्ट केले. तसेच आमदार राजेंद्र राऊत यांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी एक वर्षाची मुदत मागितल्याची आठवणही त्यांनी करुन दिली.
यानंतर विरोधी नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील विकासकामांना जाणीवपूर्वक मंजुरी दिली जात नसल्याचा आरोप करत, लोकवस्ती नसलेल्या भागांतील कामांना प्राधान्य दिले जात असून विरोधी सदस्यांच्या प्रभागात लोकवस्ती असलेल्या भागात कामे केली जात नसल्याचा आरोप केला.
सभागृह सुरु झाल्यानंतर तब्बल ३९ मिनिटांनी विषयपत्रिकेवरील कामकाज सुरु झाले. उर्वरित वेळेत सर्व ४० विषय मंजूर करण्यात आले. या चर्चेत विरोधी पक्षाकडून ज्योतिर्लिंग कसबे, नवनाथ माळगे, विद्या बंगाळे, चांगुणा जाधव, गोदावरी शिंदे, मेहंदीमिया लांडगे, अनिकेत कारंडे तर सत्ताधारी पक्षाकडून संदेश काकडे, संतोष बारंगुळे, दिपक राऊत, विजय चव्हाण यांनी सहभाग घेतला.