सोलापूर : बुधवार पेठ, मिलिंद नगरातील प्रबुद्ध भारत तरुण मंडळ – पी. बी. ग्रुपच्या वतीने यंदाच्या भीम जयंती मिरवणुकीत इतिहासाला उजाळा देणारा भव्य आणि लक्षवेधी देखावा साकारला जाणार आहे. १९४१ मधील ऐतिहासिक कसबे तडवळे परिषदेला केंद्रस्थानी ठेवत ऐतिहासिक बैलगाडी मिरवणुकीचा देखावा सादर केला जाणार असून, माजी गटनेते तथा मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक दिमाखात पार पडणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे दि. २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी पार पडलेल्या पहिल्या महार-मांग वतनदार परिषदेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अनुयायांनी तब्बल ५१ बैलगाड्यांचा भव्य ताफा उभारून ऐतिहासिक मिरवणूक काढली होती. हाच प्रेरणादायी प्रसंग यंदा देखाव्याच्या माध्यमातून जिवंत केला जात असून, तो मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. मिलिंद नगरातील प्रबुद्ध भारत तरुण मंडळाची स्थापना १९५२ साली झाली असून, मंडळाने सातत्याने सामाजिक कार्याची परंपरा जपली आहे. वर्षभर विविध उपक्रमांद्वारे समाजसेवेची कास धरत मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लेझीम ताफा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त आरोग्य शिबिरे, बुद्ध जयंतीनिमित्त खीर वाटप असे विविध उपक्रम राबवले जातात. तसेच दिवाळीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप, सिद्धेश्वर यात्रेत भाविकांना दूध वाटप, महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान अशा उपक्रमांतून मंडळाचा सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटतो. शैक्षणिक क्षेत्रातही मंडळ सक्रिय असून, सोलापूर शहरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी, गणवेश व शैक्षणिक साहित्याकरिता आर्थिक मदत सातत्याने दिली जाते. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, हा आमचा मुख्य हेतू आहे, असे आनंद चंदनशिवे यांनी स्पष्ट केले.
मिरवणुकीची नियोजनबद्ध तयारी
भव्य देखावा साकारण्यासाठी सुमारे २० कार्यकर्त्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. शिस्तबद्ध आणि आकर्षक मिरवणूक साकारण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. यामध्ये रंगराज भवन फॅब्रिकेशन, तसेच रामपुरे यांच्यासह पुण्यातील सुप्रसिद्ध मूर्तिकार रुपेश उघाडे यांचे विशेष योगदान लाभले आहे.
डॉ. आंबेडकरांचे विचार कृतीत आणण्यासाठी कटिबद्ध
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे, हीच आमची भूमिका आहे. सामाजिक एकता, शिक्षण आणि संघटनेच्या बळावर समाज उभारणीचा संदेश या देखाव्यातून दिला जाणार आहे. तरुण पिढीने इतिहासातून प्रेरणा घेऊन पुढे यावे, हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे, असे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.

























