सोलापूर – जय जवान जय किसान मुलांची सैनिक शाळा व ज्युनिअर कॉलेज येथे पालक-शिक्षक सभा चंद्राम चव्हाण गुरुजी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे कमांडंट अशोक कुमार मनचंदा होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता तसेच चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रशालेचे प्राचार्य रवींद्र चव्हाण यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा व विविध उपक्रमांतील प्रगतीचा आढावा पालकांसमोर मांडला.
यानंतर माळी सरांनी वर्षभरात शाळेत राबविण्यात आलेल्या तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व इतर उपक्रमांची माहिती पालकांना दिली. ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर जाधव सरांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत, अभ्यासाबाबत तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण सूचना विद्यार्थी व पालकांना दिल्या.
सभेदरम्यान पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या प्रगतीबद्दल, प्राचार्य रवींद्र चव्हाण यांच्या कार्याबद्दल तसेच सर्व शिक्षकांच्या मेहनत व मार्गदर्शनाबद्दल गौरवोद्गार काढले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सर्व पालकांच्या वतीने प्राचार्य रवींद्र चव्हाण, कमांडंट अशोक कुमार मनचंदा तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यानंतर प्रशालेतील सर्व शिक्षकांचा पालकांना परिचय करून देण्यात आला. शिक्षक व पालक यांच्यातील सुसंवादातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा सकारात्मक संदेश या सभेत देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाने पालक-शिक्षक सभेची सांगता झाली. पालकांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेच्या कार्याबद्दल पालकांनी व्यक्त केलेले समाधान यामुळे ही पालक-शिक्षक सभा अत्यंत उत्साहपूर्ण व संस्मरणीय ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नागणे मॅडम यांनी केले तर आभार श्री अत्तार सर यांनी मानले.
Post Views: 16