जालना : मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा होत असताना आमदारांनी आपल्या मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा विचार करून वैयक्तिक भूमिका मांडण्यापेक्षा राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनीच या प्रश्नावर आपली अधिकृत आणि स्पष्ट भूमिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करावी, असे खुले आवाहन भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस तथा आमदार संजय कुटे यांनी केले. जालना येथील छत्रपती व्ही. के. फाउंडेशन आणि छावा महाराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सकल मराठा संवाद मेळाव्यात’ ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मेळाव्याला मराठा समाजातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी कुटे यांनी मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना सरकार आणि आंदोलनकर्ते या दोन्ही बाजूंच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले.आमदार कुटे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत क्लिष्ट झाला असून, त्यावर स्पष्ट भूमिका घेण्यास अनेकजण टाळाटाळ करीत आहेत. काही आमदार पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याऐवजी आपल्या मतदारसंघातील जातीय समीकरणांचा विचार करून भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या मतदारसंघात मराठा मतदारांचे प्राबल्य आहे, तेथे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जाते; तर ओबीसी मतदारांची संख्या अधिक असलेल्या मतदारसंघात त्याच मागणीला विरोध केला जातो. अशा परस्परविरोधी भूमिकांमुळे समाजात संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.मराठा आरक्षणाच्या तांत्रिक मुद्द्यांवर भाष्य करताना कुटे यांनी राज्यात सापडल्याचे सांगितल्या जाणाऱ्या 54 लाख कुणबी नोंदींच्या चर्चेवरही प्रश्न उपस्थित केला. या नोंदी नवीन नसून विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात त्या पूर्वापार अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्याच्या संदर्भात सुमारे 26 हजार कुणबी नोंदी सापडल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी ‘हैदराबाद गॅझेट’च्या आधारे आरक्षण देण्याची आहे. मात्र, या आधारे अद्याप प्रशासनाकडून एकही कुणबी प्रमाणपत्र जारी झालेले नसल्याचा दावा आमदार कुटे यांनी केला. त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्ते या दोघांनीही आरक्षणाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबींवर स्पष्ट भूमिका जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या संवाद मेळाव्यास आमदार नारायण कुचे, मनपाचे उपमहापौर राजेश राऊत, नगरसेवक भास्कर दानवे, माजी उपनगराध्यक्ष सुनील आर्दड, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, सभापती सौ संध्या देठे, विभावरी ताकट, संस्थापक कोषाध्यक्ष संभाजी ब्रिगेड संतोष गाजरे, जिल्हाध्यक्ष भागवत काळे उपाध्यक्ष नामदेव काळे, तालुकाध्यक्ष उद्धवराव गुळमकर राजाभाऊ गुलगे, गणपत जाधव शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यासह समाजबांधव व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख युवा नेते सुनील बापू आर्दड, ज्योतीराम माने व प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक विष्णू कदम यांनी केले. यावेळी विविध मान्यवर तसेच पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकार परिषद जालनाचे अध्यक्ष अंकुश आप्पा देशमुख, व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष राजेश भालेराव, प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष दीपक शेळके, संपादक भरत मानकर, संतोष भुतेकर, अर्पण गोयल, अंकुश गायकवाड, उपसंपादक संजय शेलकर, रवि शिंदे, संपादक विकास बागडी, भगवान साबळे, संदीप भाकरे, बंडू सुरडकर, सुशील कुमार वीठोरे, अमीर खान, संजय उनगे, अविशास कवळे, शेख नुर, सुनिल नरवडे, हुसेन कादरी आदी पत्रकार उपस्थिती होते.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय पक्षांनी आता केवळ आश्वासने किंवा मतदारसंघनिहाय भूमिका न घेता आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, या आमदार संजय कुटे यांच्या आवाहनामुळे जालन्यातील या संवाद मेळाव्याला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले.





















