मुंबई : ओएनजीसी कामगार नेते व स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस श्री प्रदीप मयेकर यांची पेट्रोलियम गॅस वर्कस फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सलग सहाव्यांदा निवड झाली आहे. पेट्रोलियम गॅस वर्कस फेडरेशन ऑफ इंडियाची त्रैवाषिक परिषद नुकतीच शिवसेना भवनाच्या सभागृहात संपन्न झाली. दोन दिवशीय या परिषदेत फेडरेशनचे संस्थापक श्री स्वदेश देबराॅय , ब्राझील, नेपाळ व बांगलादेश या देशातील तेल क्षेत्रातील कामगार नेते सलग दोन दिवस उपस्थित होते. या परिषदेचे उद्घाटन शिवसेना नेते व लोकसभा खासदार श्री अनिल देसाई यांच्या हस्ते झाले.
भारतातील ओएनजीसी,भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल,कोल इंडिया,एमआरपीएल,पवनहंस,गेल,सीपीसील ,एनआरल,कोची,बोरोंगाईन व ओपाल रीफायनरी त्याचबरोबर पेट्रोल पंप वर्कस युनियन अशा विविध पेट्रोलियम व गॅस कंपन्यांतील पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेल व गॅस या उद्योगात होणारे बदल व नियमित व कंत्राटी कामगारांच्या बाबतीत आलेले नवीन कामगार कायदे यासंबंधी सविस्तर चर्चा या परिषदेत करण्यात आली व त्याअनुषंगाने भविष्यातील रणनीती ठरविण्यात आली.
आगामी तीन वर्षांसाठी या परिषदेत पेट्रोलियम व गॅस वर्कस फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ओएनजीसी कामगार नेते व स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस श्री प्रदीप मयेकर यांची फेडरेशनच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली. श्री . प्रदीप मयेकर हे फेडरेशनच्या माध्यमांतून तेल व गॅस प्रकल्पातील कामगारांच्या हितासाठी व आर्थिक उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून सलग सहाव्यांदा त्यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. ओएनजीसी मधील कामगारांच्या उत्कर्षासाठी सलग पन्नास वर्षे निस्वार्थीपणे काम करत असताना त्यांनी मुंबईतील इतर विविध आस्थापनातील कामगारांना युनियन व लोकाधिकार समितीच्या माध्यमातून सातत्याने निस्वार्थी भावनेने मदत केली. त्यांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक उल्लेखनीय असेच आहे तसेच आंम्हा सर्व कामगारांसाठी गौरवास्पद आहे अशीच भावना उपस्थित कामगारांच्या वतीने ओएनजीसी स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष संदिप गावडे यांनी व्यक्त केली.


















