महाराष्ट्रातही शंभर टक्के प्रतिसादाचा दावा
केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात एआयओसीडी आक्रमक
१२.५० लाख औषध विक्रेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न
सोलापूर : केंद्र सरकारकडून प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना (एआयओसीडी ) ने दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक दिली आहे. या बंदला महाराष्ट्रातही शंभर टक्के प्रतिसाद मिळेल, असा दावा सोलापूर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पुजारी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे .
ड्रग प्राईझ कंट्रोल ऑर्डर (डीपीओ)2013 अंतर्गत काही जीवनावश्यक औषधांवर होलसेलर व रिटेलरचा नफा निश्चित करण्यात आला आहे. मात्र, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून २० ते ४० टक्क्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या जात असल्याने पारंपरिक औषध विक्रेत्यांपुढे गंभीर स्पर्धात्मक संकट निर्माण झाले आहे.
या कायद्यानुसार उत्पादकांकडून कडून काही जीवनावश्यक औषधीवर ८ टक्के होलसेलरला व १६ टक्के रिटेलरला, तसेच अनियंत्रित औषधीवर १० टक्के होलसेलर व २० टक्के रिटेलरला नफा निश्चित केला आहे. मात्र, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या अव्यवस्थित स्पर्धा निर्माण करून २० टक्के ते ४० टक्के पर्यंत डिस्काउंट देत आहेत. त्यामुळे देशातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला असून अनेक दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत.देशातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला असून अनेक मेडिकल दुकाने बंद होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे सरकारने नियंत्रित नफ्याच्या तरतुदीचा पुनर्विचार करावा तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाऐवजी औषध विक्रेत्यांना ब्रँड सबस्टिट्यूट औषधे देण्याचा अधिकार द्यावा, अशी प्रमुख मागणी केली आहे. संबंधित केंद्रीय मंत्री, प्रशासकीय अधिकारी तसेच पंतप्रधानांकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही सकारात्मक दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संघटनेला आंदोलनात्मक भूमिका स्वीकारावी लागली आहे.
लोकशाही मार्गाने सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने तातडीने न्याय्य निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही
जिल्हा सचिव राजेश विरपे यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेस प्रशांत खलिपे, बसवराज मणुरे,श्याम बाहेती, सिध्देश्वर घाळे, मनीष बलदवा,
विलास कारभारी, सिध्दाराम चाबुकस्वार,अनंत चिटकुल, प्रताप कांचन आदी उपस्थित होते.
Post Views: 16