सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या जागांसाठी निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे. अर्ज विक्री व स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी नामनिर्देशन पत्रे खरेदी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्जाची विक्री झाली असली तरी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाल नसल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.
पहिल्या दिवशी आ. सुभाष देशमुख, माजी आ. राजन पाटील, माजी आ. दिलीप माने, जयवंतराव जगताप, माजी संचालक सुरेश हसापुरे, कल्याणराव काळे, नगरसेवक जयकुमार माने, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंड, भारत जाधव, मनीष देशमुख, अजिंक्यराणा पाटील, विक्रांत पाटील, सिद्धाराम चाकोते, सिद्धेश्वर अवताडे, बबन अवताडे, सुशील अवताडे, श्रीदीप हसापुरे, मारुती लवटे, शंभूराजे जगताप यांच्यासह अनेक इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत.
जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोडी आणि बैठकांचे सत्र सुरूच आहे. महायुती आणि मविआ यांच्यात थेट संघर्ष होणार की अंतर्गत तडजोडीतून सत्तासमीकरणे जुळणार, हे पहावं लागणार आहे.






















