धाराशिव : जिल्हा परिषद धाराशिव ही ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असून, आणखी एका अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील ४ ते ५ महिलांना मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.
या उपक्रमाची जबाबदारी उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तींवर सोपविण्यात येणार आहे. गावातील पात्र महिलांची निवड करणे, त्यांना संबंधित योजनांची माहिती देणे, प्रस्ताव तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि उद्योग उभारणीसाठी आवश्यक सहकार्य करणे, अशी महत्त्वाची भूमिका समुदाय संसाधन व्यक्ती पार पाडणार आहेत.
या उपक्रमाला अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक प्रस्तावामागे समुदाय संसाधन व्यक्तींना जिल्हा परिषदेमार्फत १,००० रुपयांचे प्रोत्साहनपर मानधन देण्यात येणार आहे.
या संदर्भातील निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. अर्चनाताई पाटील यांनी केली. यावेळी जिल्ह्यातील समुदाय संसाधन व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, ग्रामीण भागात उद्योगनिर्मितीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.





















