सोलापूर – आषाढी यात्रेसाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असताना त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी यात्रेदरम्यान आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा यासाठी निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांनी दिली.
आषाढी यात्रेदरम्यान पालखी मार्गावर आणि मुक्काम स्थळी वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियोजनाला वेग दिला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समन्वयातून यात्रा यशस्वीपणे पार पडली होती. यंदाही त्याच धर्तीवर अधिक सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. यात्रेच्या काळात स्वच्छता, निवारा आणि आरोग्य सेवांवर विशेष भर देण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोबाईल टॉयलेटची संख्या वाढविण्यात येत असून, पालखीबरोबर चालत येणाऱ्या भाविकांना शारीरिक थकवा दूर करण्यासाठी मसाजर यंत्रणाही अधिक प्रमाणात उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तसेच पालखी मार्गावर कार्डियाक ॲम्बुलन्ससह विविध प्रकारच्या आरोग्य सेवा, वैद्यकीय पथके आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध राहणार आहे. या अनुषंगाने आवश्यक औषध खरेदीसाठी आरोग्य विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे औषध खरेदीसाठी निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, औषध खरेदीच्या प्रक्रियेत झालेल्या विलंबाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या असून याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचेही केदार यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसह पालखी मार्गाचा प्रत्यक्ष दौरा करून आरोग्य केंद्रांतील सुविधा, मनुष्यबळ आणि उपलब्ध साधनसामग्रीचा आढावा घेतला जाणार आहे. वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सभापती चेतनसिंह केदार यांनी सांगितले.
Post Views: 3