सोलापूर – जिल्हा परिषद सोलापूरच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून येणाऱ्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या फायलींच्या हाताळणीवरून प्रशासकीय कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित फायली कार्यालयात सादर करताना आवक-जावक नोंदवहीत नोंद न करता त्या थेट कर्मचाऱ्यांकडे स्वीकारल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील पत्रव्यवहार आणि फाइल व्यवस्थापनाच्या प्रक्रियेचे पालन होते की नाही, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक पत्राची व फाइलची नियमानुसार आवक नोंद करणे आणि पुढील कार्यवाहीसाठी ती संबंधित विभागाकडे पाठविल्याची जावक नोंद ठेवणे अपेक्षित असते. या प्रक्रियेमुळे फाइल कार्यालयात कधी आली, ती कोणाकडे पाठविण्यात आली आणि तिच्यावर पुढे काय कार्यवाही झाली, याचा मागोवा घेणे शक्य होते. मात्र, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून येणाऱ्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या फायलींच्या बाबतीत या प्रक्रियेचे पालन होत नसल्याचा आरोप पुढे आल्याने कार्यालयीन शिस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
संबंधित फायली आवक-जावक नोंदवहीत नोंद न करता थेट स्वीकारल्या जात असतील, तर त्यामागील प्रशासकीय प्रक्रिया काय आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे फायली स्वीकारण्याची जबाबदारी किंवा अधिकार कोणी दिले, तसेच त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता आहे का, याची पडताळणी करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
आवक-जावक नोंदवही ठेवण्यामागचा उद्देशच फाइलच्या हालचालींची अधिकृत नोंद आणि उत्तरदायित्व निश्चित करणे हा आहे. त्यामुळे नोंदवहीतील नोंदी टाळल्या जात असल्यास फाइलच्या प्रक्रियेचा मागोवा घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर संबंधित फायलींच्या प्रत्यक्ष नोंदी, स्वीकारण्याची पद्धत आणि त्यावरील कार्यवाही तपासण्याची मागणी होत आहे.
चौकट
दुहेरी पदभारामुळे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा
दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्यांवरूनही प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची पंढरपूर येथे गटविकास अधिकारी म्हणून पूर्णवेळ नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडे स्वच्छ भारत अभियानाचा अतिरिक्त पदभार देण्यात आल्याचा उल्लेख केला जात आहे. या जबाबदाऱ्यांमुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर पुरेसे लक्ष दिले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Post Views: 11