सोलापूर – जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट आणि जलजीवन मिशनअंतर्गत रखडलेल्या कामांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंतापदाची जबाबदारी बदलण्यात आली आहे. मंगळवेढ्याचे उपअभियंता प्रसाद काटकर यांच्याकडील पदभार आता अक्कलकोटचे उपअभियंता व्ही. डी. राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राठोड यांनी पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली आहे.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी, पाणीटंचाईवरील उपाययोजना आणि जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने या विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, या महत्त्वाच्या विभागाला अद्याप पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मिळालेला नाही. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदलांबरोबरच विभागाच्या नियमित कामकाजावर आणि प्रलंबित योजनांच्या पूर्ततेवरही लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांच्यानंतर या विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मंगळवेढ्याचे उपअभियंता प्रसाद काटकर यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला होता. आता त्यांच्याकडील जबाबदारी राठोड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच विभागाचा कारभार सुरू आहे. सध्या पाणीटंचाईची संभाव्य तीव्रता लक्षात घेता ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करणे आणि जलजीवन मिशनअंतर्गत रखडलेल्या कामांचा आढावा घेणे, ही नव्या प्रभारी अधिकाऱ्यांसमोरील प्रमुख आव्हाने असणार आहेत. पदभारातील बदलापेक्षा प्रलंबित कामांना गती देणे आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे, याकडे आता लक्ष लागले आहे.
कोट
मंगळवेढा तालुक्याची पूर्णवेळ जबाबदारी माझ्याकडे आहे. सर्वात जास्त पाणीटंचाई मंगळवेढा तालुक्यात आहे. मुख्यालय आणि मंगळवेढाचे कामकाज पाहताना जिकिरीचे होत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना विनंती अर्ज केल्यानंतर माझी मूळ पदावर नियुक्ती झाली आहे. अशी माहिती मंगळवेढ्याचे उपअभियंता प्रसाद काटकर यांनी दिली.