रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) द्वैमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम राहणार असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज, शुक्रवारी दिली.
चालू आर्थिक वर्षातील पतधोरण समितीची ही दुसरी बैठक होती. आरबीआयने रेपो दरात फेब्रुवारी 2023 मध्ये शेवटचा बदल केला होता. म्हणजेच गेल्या 16 महिन्यांपासून रेपो दर स्थिर आहेत.रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 25 साठी विकास दराचा अंदाज 7 टक्क्यांवरून 7.2 टक्के केला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 7.2 टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे. तर आधी तो 6.9 टक्के होता. देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार असून सत्ताधारी भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे. अशा स्थितीत निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या बैठकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.