अक्कलकोट : निर्भीड, निःपक्षपाती आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या झुंजार पत्रकारितेची दखल घेत ज्येष्ठ पत्रकार स्वामीनाथ हरवाळकर यांना मानाचा महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे यांच्यावतीने निर्भीड पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार डॉक्टर स्वाती महाळंक, मुख्य कार्यवाह पुणे साहित्य परिषद यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सामान्य नागरिकांच्या समस्या, सामाजिक अन्याय, प्रशासनातील त्रुटी तसेच जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याची त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
पुरस्कार स्वीकारताना हरवाळकर यांनी, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून सत्यासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचा सन्मान आहे. भविष्यातही निर्भीडपणे जनतेचे प्रश्न मांडत राहणार,” अशी भावना व्यक्त केली.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.झुंजार पत्रकारितेच्या या सन्मानामुळे पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमास नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, स्वागताध्यक्ष महेश इंगळे, साहित्य परिषदेच्या अक्कलकोटच्या अध्यक्षा शैलशिल्पा जाधव, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.झुंजार पत्रकारितेच्या पुरस्काराने पत्रकारितेतील योगदानाचा गौरव झाल्याने सर्वच थरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
….