करमाळा –

ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या श्री कमलादेवी मंदिर व परिसर क्षेत्रात आता भाविकांना धार्मिक किंवा भावनिक रील्स (Reels), फोटो आणि व्हिडिओ बनवण्यास प्रशासनाकडून सक्त मनाई करण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि परिसरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टने हा अत्यंत महत्त्वाचा व कडक निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंदिर परिसरात एक जाहीर ताकीद देणारा फलकही लावण्यात आला आहे.
थेट फौजदारी कारवाई आणि दंड-
मंदिर प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, जर कोणी भाविक किंवा नागरिक या नियमाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याचा मोबाईल आणि कॅमेरा त्वरित जप्त केला जाईल. एवढेच नव्हे तर संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात येणार आहे.
या कायद्यांतर्गत होणार कारवाई-
नियम मोडणाऱ्यांवर खालील कलमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल:
BNS (भारतीय न्याय संहिता) कलम २९८ व २९९: धार्मिक भावना दुखावणे आणि मंदिराचे पावित्र्य भंग करणे (गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंत कैद आणि दंडाची तरतूद).
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११० व ११२ सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे आणि शांततेचा भंग करणे (दंडात्मक कारवाई व अटक).
भाविकांना आवाहन
“मंदिराच्या शांततेचा आणि पावित्र्याचा भंग होणार नाही याची जबाबदारी सर्व भाविकांची आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस व्यक्ती स्वतः जबाबदार राहील,” अशी सक्त ताकीद श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टने हुकुमावरून जारी केली आहे. सोशल मीडियाच्या नादात मंदिराचे नियम न मोडता भाविकांनी दर्शनाचा पवित्र आनंद घ्यावा, असे आवाहन सुजाण नागरिकांमधून केले जात आहे.
Post Views: 9