टेंभुर्णी – टेंभुर्णी शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा असतानाच टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या बालाजी मेडिकलसमोरून सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी अवघ्या पाच मिनिटांत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर ही चोरी झाल्याने शहरातील वाहनांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, घटनेची टेंभुर्णी शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
याबाबत सुधाकर भानुदास जाधव (वय ६५, रा. पांडुरंग हॉस्पिटल शेजारी, पुणे-सोलापूर रोड, टेंभुर्णी) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४४/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांची काळ्या रंगाची होंडा सीबी शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच-४५/एसी-५३६४) दिनांक २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.५० ते ७.५५ वाजण्याच्या दरम्यान बालाजी मेडिकलसमोर उभी होती. या अवघ्या पाच मिनिटांच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या संमतीशिवाय दुचाकी चोरून नेली.
दुचाकीची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असून तिचा चेसीस क्रमांक ME4JC654EHT039767 तर इंजिन क्रमांक JC65ET1062976 असा आहे. दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात शोध घेण्यात आला; मात्र ती आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
पोलीस ठाण्यासमोरच चोरी झाल्याने चर्चेला उधाण
दरम्यान, टेंभुर्णी शहरात अवैध वाळू उपसा तसेच चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू असतानाच आता थेट पोलीस ठाण्यासमोरूनच सेवानिवृत्त पोलिसाची दुचाकी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास त्यातील फुटेज तपासून चोरट्याचा माग काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
‘पोलीस ठाण्याच्या समोरच वाहन सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांचे काय?’ असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या चोरीचा तपास जलदगतीने करून दुचाकी हस्तगत करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाचा तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल केशव झोळ करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार पंडित मिसाळ यांनी केली आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Post Views: 6