बार्शी – तालुक्यातील पांगरी येथील सौ. ऋतुजा सचिन ठोंबरे-लाडे यांची सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड झाली. पवित्र पोर्टलद्वारे नुकत्याच जाहीर झालेल्या शिक्षक भरतीच्या निकालात त्यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत असताना सातत्य, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सौ. ऋतुजा ठोंबरे यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांगरी येथे घेतले. माध्यमिक शिक्षण शिवछत्रपती विद्या मंदिर, पांगरी येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर अध्यापिका महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले.
विवाहानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शिक्षिका होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास सुरु ठेवला. संसार आणि अभ्यासाचा समतोल साधत त्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनतीच्या जोरावर अखेर त्यांचे शिक्षिका होण्याचे स्वप्न साकार झाले.
सौ. ऋतुजा ठोंबरे या पत्रकार सचिन ठोंबरे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल पांगरीसह बार्शी तालुक्यातील नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 13