अकलूज – सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची ६६ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली. सभे पुढील सर्वच विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली.
या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,स्वरुपाराणी मोहिते पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील,व्हा.चेअरमन शंकरराव माने देशमुख, रामचंद्र सावंत पाटील, अँड प्रकाशराव पाटील, रावसाहेब मगर, सुभाष निंबाळकर, कार्य.संचालक सुहास यादव यांच्यासह कारखान्याचे आजी माजी संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद बहूसंख्येने उपस्थित होते.
संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या,सहकार महर्षी कारखान्याने सन २०१० मध्ये आधुनिकीकरण केले. याचा भविष्यात शेतकऱ्यांना फायदा झाला.आजच्या ए. आय. तंत्रज्ञानाच्या काळात साखर उद्योगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कारखान्याची मशिनरी,सहवीज निर्माती प्रकल्प व डिस्टलरी प्रकल्प याचे आधुनिकीकरण करणे काळाची गरज आहे. राज्यातील दोनशे कारखान्यांची दिवसाची गाळप क्षमता ही दहा लाख मे. टन पेक्षा अधिक आहे.यातच गाळपाचा कालावधी कमी झाला असून कारखान्याची संख्या मात्र वाढली आहे. खर्च व उत्पन्न यामध्ये मोठी तफावत होत आहे. केंद्र सरकार भविष्यात इथेनॉल उत्पादनावर बंदी आणण्याचे संकेत आहेत. यामुळे भविष्यात साखरेचे दर वाढतील.या साठी साखर उत्पादन वाढवावे लागेल. कमी खर्चात जास्त गुणवत्तेची साखर निर्माण करण्यासाठी आधुनिकीकरण करणे काळाची गरज बनली आहे.
जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात ३६ पैकी ३१ कारखाने खाजगी आहेत. खाजगी कारखाने ५० कोटीचा तोटाही सहन करू शकतात परंतु सहकाराला ते पेलवत नाही. किमान१६० दिवस गाळप झाले नाही, तर कारखान्याचे,साखर उद्योगाचे व देशाचे मोठे नुकसान होते. सहकार महर्षी कारखान्यातील मशिनरी, बॉयलिंग हाऊसचे आधुनिकीकरण केले तर भविष्यात सभासदांना याचा मोठा लाभ होणार आहे.या वेळी गतवर्षी एकरी सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या सभासदांचा बक्षीस देऊन सन्मान ही करण्यात आला. तर सहकार महर्षी इंजिनिअरिंग महाविद्यालयातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचाही सन्मान झाला.
Post Views: 9