सोलापूर : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्याचा दृढ संकल्प, राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्यांप्रती निष्ठा आणि राष्ट्रपुरुषांच्या कार्याविषयी कृतज्ञता अशा वातावरणात सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सामूहिक शपथग्रहण करण्यात आले. याचवेळी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपप्राचार्य डॉ. किशोर पवार, डॉ. मधुकर जडल, डॉ. देवराव मुंडे, डॉ. अनिल कांबळे, डॉ. नागोराव भुरके यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून उपस्थितांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार या शपथग्रहणातून व्यक्त झाला.
*फोटो: राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथग्रहण करताना विद्यार्थिनी आणि प्राध्यापकवृंद*
*चौकटीतील मजकूर*
*राष्ट्रीय एकात्मता हीच देशाच्या सामर्थ्याची खरी ओळख : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे*
विविधतेने नटलेल्या भारताची खरी ताकद राष्ट्रीय एकात्मतेत आहे. युवकांमध्ये राष्ट्रनिष्ठा, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याची भावना वृद्धिंगत होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त घेतलेली शपथ केवळ औपचारिकता न राहता ती आपल्या आचरणातून प्रतिबिंबित झाली पाहिजे. देशाची एकता आणि अखंडता जपणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी व्यक्त केले.
Post Views: 15