सांगोला – भविष्यातील पाणीटंचाई व एल-निनोच्या संभाव्य परिणामांवर मात करण्यासाठी सांगोला तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने जलतारा शोषखड्डे अभियानाला वेग आला आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे जलसंधारणाच्या कामांना चालना मिळत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात शोषखड्डे तयार करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या शोषखड्ड्यांसाठी अनुदान दिले जात असून एका एकरासाठी एक शोषखड्डा ही अट लागू आहे.
दरम्यान, सांगोला तालुक्यातील राजुरी येथील शेतकरी पांडुरंग खुळे यांच्या शेतात प्रत्यक्ष शोषखड्ड्याचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शोषखड्डा तयार करण्याची पद्धत, तांत्रिक निकष व त्याचे फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. केवळ खड्डा खणणे नव्हे तर वैज्ञानिक पद्धतीने जलपुनर्भरण केल्यास भूजल पातळी वाढते, असे स्पष्ट करण्यात आले. जलतारा शोषखड्ड्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून विहीर व बोअरवेलची पाण्याची पातळी वाढते. परिणामी पाणीटंचाईवर मात होऊन शेती उत्पादनात वाढ होते. हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता जलसंधारणाचे छोटे-मोठे उपायही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत उप कृषी अधिकारी श्रीधर शेजवळ यांनी व्यक्त केले. या प्रात्यक्षिकावेळी संतोष यजगर, पांडुरंग खुळे, सचिन खुळे, गणेश दबडे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते
साधारणतः ५ फूट लांब, ५ फूट रुंद व ६ फूट खोल अशा आकाराचे शोषखड्डे उताराच्या बाजूला किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी केल्यास पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरते व आसपासच्या जलस्रोतांची पातळी वाढते. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने व लोकसहभागातून जलतारा शोषखड्डे तयार करावेत.
-बाळासाहेब सावंत, सहा.कृषी अधिकारी


























