
संजय कांबळे यांनी 1994 मध्ये मुंबई विभागात भारतीय रेल्वे सेवेत रुजू झाले. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे विविध पदांवर काम केल्यानंतर 1996 मध्ये त्यांची सोलापूर विभागात बदली झाली. 2003 पर्यंत त्यांनी ओपन लाईन तिकीट तपासणी पथकात कार्य केले. त्यानंतर त्यांची मध्य रेल्वेच्या प्रतिष्ठित फ्लाइंग स्कॉड (सीसीएम स्कॉड) मध्ये नियुक्ती करण्यात आली. या पथकात त्यांनी सुमारे 15 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली.
फ्लाइंग स्कॉडमधील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सोलापूर विभागात परत येऊन सीटीआय (चौकशी), सीटीआय (मुख्यालय) आणि अखेरीस डीसीटीआय, सोलापूर या महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळली. आपल्या संपूर्ण सेवाकाळात महसूल संरक्षण, तिकीट तपासणीतील शिस्त, प्रवाशांना दर्जेदार सेवा आणि कर्तव्यनिष्ठ कार्यपद्धती यासाठी ते ओळखले जात होते. त्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता आणि कार्यतत्परतेमुळे त्यांनी रेल्वे प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांच्या निवृत्तीनिमित्त सोलापूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांच्या निरोगी, आनंदी व समृद्ध निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रदक्षिणे, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.



















