बार्शी – येथील नवमहाराष्ट्र विद्या विकास मंडळाच्या न्यू हायस्कूलची सन २०१९- २० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थिनी वैष्णवी श्याम कळसाईत हिने पोलीस विभागात यशस्वीरीत्या भरती होऊन पोलीस पद भूषवले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्यावतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संचालक रावसाहेब मनगिरे यांच्या हस्ते तसेच क्रीडाशिक्षक अरविंद कोळी सर यांच्या उपस्थितीत वैष्णवीचा शाळेत सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैष्णवीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शाळेचे तसेच परिसराचे नाव उंचावले असून इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.
सन्मान सोहळ्यात बोलताना रावसाहेब मनगिरे यांनी वैष्णवीच्या मेहनतीचे कौतुक करत, “कष्ट आणि ध्येय निष्ठा असेल तर कोणतीही अडचण यशाच्या आड येत नाही,” असे सांगितले. तसेच अरविंद कोळी सर यांनीही विद्यार्थ्यांनी वैष्णवीचा आदर्श ठेवून आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वैष्णवीने आपल्या यशामागील प्रवास सांगत शाळेचे आणि शिक्षकांचे आभार मानले.


























