सोलापूर – अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने जारी केली आहे. दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, १३ जून रोजी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थ्यांना १३ ते १६ जूनदरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज अनलॉक करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाग-१ आणि भाग-२ मधील माहितीची पुन्हा पडताळणी करून अर्ज लॉक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कालावधीत नवीन विद्यार्थ्यांनाही नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार, ६ ते ९ जून दरम्यान नवीन नोंदणी, पसंतीक्रम भरणे आणि अर्ज लॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच व्यवस्थापन, इन-हाऊस आणि अल्पसंख्याक (मायनॉरिटी) कोट्यांतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित कोटा पसंती अर्जही ऑनलाईन भरून लॉक करणे आवश्यक आहे.
यानंतर १० ते १२ जूनदरम्यान डेटा प्रोसेसिंग आणि अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर १३ जून रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालय वाटप लॉगिनमध्ये पाहता येणार असून, त्याची माहिती एसएमएसद्वारेही दिली जाणार आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, गुणवत्ता यादीत मिळालेले महाविद्यालय स्वीकारायचे असल्यास विद्यार्थ्यांनी लॉगिनमध्ये ‘प्रोसीड अॅडमिशन’ पर्याय निवडून संबंधित महाविद्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा. १६ जूननंतर प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित जागेवरील दावा संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
कोट
अकरावी प्रवेशासाठी १९ जून रोजी दुसऱ्या फेरीअखेर शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांचा तपशील पोर्टलवर प्रसिद्ध केला जाणार असून त्यानंतर पुढील प्रवेश फेरीचे नियोजन करण्यात येणार आहे.
– सचिन जगताप, शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग
चौकट
विद्यार्थी आणि पालकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता अर्जातील माहिती अचूक भरून वेळेत लॉक करावी, तसेच गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाची प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
चौकट
दुसऱ्या फेरीचे महत्त्वाचे वेळापत्रक
६ ते ९ जून – नवीन नोंदणी, पसंतीक्रम भरणे व अर्ज लॉक करणे
१० ते १२ जून – डेटा प्रोसेसिंग व पडताळणी
१३ जून – दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
१३ ते १६ जून – महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे
१९ जून – रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध
Post Views: 8