सोलापूर – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना पुरस्कृत व अखिल भारतीय लॉन टेनीस संघटनेच्या अधिपत्याखाली वरिष्ठांच्या चौथ्या जागतिक मानांकन लॉन टेनिस (पुरुषांच्या ,महिलांच्या एकेरी , दुहेरी व मिश्र दुहेरी) स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात आले आहे.
ही स्पर्धा ३ ते ९ जुलै या कालावधीत एम.एस.एल.टी.ए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल व इलिझियम क्लबच्या मैदानावर सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत खेळविल्या जाणार आहेत .
या स्पर्धेत ३० ते ७५ वर्षापुढील पुरुष तर ३० ते ५० वर्षापुढील महिला सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत देशभरतातून १३४ खेळाडू सहभागी होणार आहेत .
स्पर्धेचे आयोजन सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेने (एस.डी.एल.टी.ए) केले आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या पिण्याच्या पाण्याची सोय स्पेनका कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे .
या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवार दिनांक ३ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे , यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने पर्यवेक्षक म्हणून पुण्याच्या वैशाली शेकटकर यांची , स्पर्धा संचालक म्हणून मुंबईच्या डोसा रामाराव यांची तर एम.एस.एल.टी.ए चे संयुक्त मानद सचिव राजीव देसाई यांच्यावर स्पर्धा व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविली आहे.
स्पर्धेतील खेळाडूना आंतरराष्ट्रीय गुण मिळणार असून यामुळे त्यांना जागतिक क्रमवारीत आगेकूच करण्यासाठी मदत होणार आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज माजी भारतीय खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
या स्पर्धेची लोकप्रियता देशभरात दिवसें दिवस वाढत चालली असून जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत एकूण ११ जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वयोगटातील सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या प्रथम ४ खेळाडूंची पोर्तुगाल येथे जानेवारी २०२७ मधे होणाऱ्या जागतिक मास्टर्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड केली जाणार आहे.
Post Views: 16