बार्शी – भगवान श्रीकृष्ण आपला अवतार संपवून श्रीमद् भागवत कथा या ग्रंथात प्रविष्ट झाल्याने हाच श्रीकृष्णाचे वांग्मयीन शरीर असून या पंचाला श्रीमद् भागवत कथामृत असेही म्हटले जात असल्याचे ह.भ.प. जयंत बोधले महाराजांनी प्रतिपादन केले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी श्रीभगवंत देवस्थान मंडळ, बोध
राज भक्त मंडळ आणि श्रीभगवंत देवस्थान पुजारी मंडळ
बडवे यांच्या संयुक्तविद्यमाने ग्रामदैवत श्रीभगवंत मंदिरात
महिनाभर घालणाऱ्या श्रावणमासीय प्रवचन मालेचा गुरुवार दि. १३ ऑगस्ट रोजी शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी प्रवचनकार ह.भ.प. जयवंत बोधले महाराज बोलत होते. यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. यापूर्वी प्रतिवर्षी वेगवेगळ्या विषयांवर महाराजांनी निरुपणे केली आहेत. त्यामधे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत माणकोजी, हरिपाठ, श्रीकृष्ण चरित्र, विष्णु सहस्रनाम, चांगदेव पासष्टी, नारद भक्ती सूत्रे, असे विविध अध्यात्मिक विषय घेण्यात आले होते. या विषयांवर बोधले महाराजांनी सतत महिनाभर निरुपण केले आहे. यावर्षी श्रीमद् भागवत कथा चिंतन भाग दोन गतवर्षीच्या श्रीमद् भागवत कथा भाग एकवरुन पुढे उर्वरित निम्म्या भागावर रोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत निरुपण केले जाणार आहे. श्रीमद् भागवत कथेचे माहात्म्य सांगत असताना मागील वर्षीच्या कथेचा सारांश रुपाने परामर्ष, धावता आढावा घेत महाराज म्हणाले, मृत्यूपेक्षा मृत्यूची भीती माणसाला त्रास देत असते आणि ही भीती घालवण्याचे काम विशेषतः श्रीमद् भागवत कथा करते. शिवलीलामृत, गुरुचरित्र हे ग्रंथ उपासनेचे आहेत तर विचार सागर, ब्रह्मसूत्र हे अभ्यासाचे ग्रंथ आहेत. श्रीमद् भागवत कथा उपासना आणि अभ्यास असा संयुक्त ग्रंथ आहे. यामध्ये १२ स्कंध, १८००० श्लोक असून पारायण उपासना आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यासही आहे. श्रोता कसा असावा तर कथा अथवा ग्रंथ ऐकणाऱ्या श्रोत्यांचा आपल्या गुरुवर विश्वास, दीनत्वाची भावना, मनोदोषावर जय आणि ऐकताना बुद्धी स्थिर असली पाहिजे. या ग्रंथामध्ये आपल्याला जीवनातील तत्वज्ञानाची उकल आणि मांडणी दिसून येते. याशिवाय प्रतिपाद्य विषय लक्षात येणे महत्त्वाचे असल्याने श्रोता तत्पर असला पाहिजे, सावधान असला पाहिजे, त्याची श्रद्धा असली पाहिजे. त्याच बरोबर इंद्रिय निग्रहही आवश्यक आहे. जगावं कसं यासाठी गीता वाचावी आणि मरावं कसं हे श्रीमद्भागवत कथेतून जाणून घ्यावे. प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते. हा ग्रंथ कृतीत नव्हे तर वृत्तीत परिवर्तन घडविणारा आहे. श्रीमद् भागवत कथा म्हणजे भारतीय संस्कृतीचे दिग्दर्शनच आहे, शिवाय पारांचाचा मूळ विषयच मृत्यूची भीती घालविणे असल्याचे महाराजांनी शेवटी स्पष्ट केले. मुक्ती म्हणजे काय? मृत्यूसमयी मुक्तीचीइच्छा व्हावी काय? संपूर्ण सृष्टीची रचना कशी झाली? कोणी केली? अवतार म्हणजे काय? यावरही आपल्या विषय विस्तारात भाष्य केले.
प्रभावशाली व्यक्तिमत्व, विविध ग्रंथातील दाखले, दृष्टांत, उदाहरणांसह अस्खलित भाषेत सुस्पष्ट उच्चारांसह मनाचा ठाव घेणारे सुश्राव्य, अभ्यासपूर्ण विवेचन, विश्लेषण आणि सर्वात विशेष म्हणजे वक्तशीरपणा आदी कारणांमुळे प्रवचनास स्थानिक श्रोत्यांचा तर उदंड प्रतिसाद मिळतो शिवाय महाराजांना मानणारे त्यांचे दूरदूरचे अनुयायी, स्नेही अधूनमधून आवर्जुन उपस्थित राहात असतात. श्रीभगवंत मंदिर प्रवचनप्रेमी महिलापुरुष मोठ्यासंख्येने उपस्थित होते.