सोलापूर – येथे शासकीय रेखाकला परीक्षेचे मूल्यमापन केंद्र अखेर मंजूर झाले आहे. सोलापूर जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना हे यश मिळाले असून, या केंद्रामुळे जिल्ह्यातील कलाशिक्षक व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. या केंद्रामुळे सोलापूर व परिसरातील कला परीक्षांच्या मूल्यमापनाचे काम आता अधिक वेगाने आणि स्थानिक पातळीवर पार पडणार आहे.
सदर मूल्यमापन केंद्र सोलापूरला मिळण्यासाठी जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघासोबतच अनेक मान्यवरांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष हातभार लावला आहे. यामध्ये माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे सचिव आदरणीय शांतय्या स्वामी, प्रशासकीय अधिकारी संगप्पा म्हमाणे आणि मुख्याध्यापक धनंजय नकाते यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे सरचिटणीस आदरणीय शालिग्राम भिरूड, राज्याध्यक्ष शेरशाह डोंगरी, राज्य सहसचिव शांतप्पा काळे, जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले, जिल्हा सचिव संतोष धारेराव यांच्या नेतृत्वाखाली हा पाठपुरावा यशस्वी झाला.
या कार्यात कलाशिक्षक पंडित स्वामी, शैलेश स्वामी, संदीप स्वामी, मदगोंडा बिराजदार, षण्मुखानंद दाते, शैलेश कुलकर्णी, अनिल रॉय यांच्यासह अखिल महाराष्ट्र राज्य व जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कलाप्रेमी मित्रमंडळींनी मोलाचे योगदान दिले.
या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच सोलापूरमध्ये मूल्यमापन केंद्र सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल सोलापूर जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघाच्या वतीने सर्व सहकाऱ्यांचे आणि मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
———–


















