बार्शी – आगळगाव येथे राहत्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गांजाची लागवड केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी कारवाई करत १० किलो १२२ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ५३ हजार ५० रुपये आहे. नशामुक्ती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही कारवाई चालू वर्षातील गांजाविरोधातील मोठ्या कारवायांपैकी एक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी आगळगाव येथे कारवाई केली. यावेळी श्रीमंत भिमराव गरड (वय ७६, रा. आगळगाव) यांच्या घराच्या पाठीमागील जागेत गांजाच्या चार झाडांची लागवड करुन त्यांची जोपासना केल्याचे आढळून आले.
पोलिसांनी गांजाची चार झाडे जप्त केली असून त्यांचे एकूण वजन १० किलो १२२ ग्रॅम आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यातील कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब), २२(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे तसेच पोलीस अमलदार युवराज गायकवाड, अमृता गुंड, सिद्धेश्वर लोंढे, ओमप्रकाश दासरे, जिदास काकडे व शिवशंकर खराडे यांच्या पथकाने केली.
अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराविरोधात बार्शी तालुका पोलिसांची मोहीम यापुढेही सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.