सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी होणार असून, या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जमा-खर्चासह जिल्हा ग्रामविकास निधीच्या माहितीवर चर्चा होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बैठकीच्या अजेंड्यावर एकूण सहा प्रमुख विषय ठेवण्यात आले आहेत. प्रारंभी दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाकडून प्राप्त झालेली महत्त्वाची परिपत्रके व शासन निर्णयांचे वाचन करून त्याची नोंद घेण्यात येणार आहे.
विकासकामांच्या प्रगतीचा घेतला जाणार आढावा
जिल्ह्यातील विविध विभागांकडून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा हा बैठकीतील महत्त्वाचा विषय ठरणार आहे. कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि निधीच्या वापराबाबत सदस्यांकडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागनिहाय विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाकडून कोणती माहिती मांडली जाते, याकडे लक्ष आहे.
स्थायी समिती ही जिल्हा परिषदेच्या कामकाजावर देखरेख ठेवणारी महत्त्वाची समिती असल्याने या बैठकीला प्रशासकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. विकासकामांवरील खर्च, निधीचे वितरण आणि विविध विभागांच्या कामांची प्रगती यावर सदस्यांकडून प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठकीत विकासकामांच्या गुणवत्तेपासून निधीच्या वापरापर्यंत कोणते मुद्दे पुढे येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, विविध विषय समित्यांच्या ऑगस्ट २०२६ मधील बैठकींच्या कार्यवृत्ताचीही नोंद घेतली जाणार आहे. याशिवाय स्थायी समितीचे अध्यक्ष तथा सभापती यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवरही चर्चा होणार आहे.
चौकट
जमा-खर्चास मंजुरीचा विषय
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांकडील जमा-खर्चाचे अवलोकन करून त्यास मंजुरी देण्याबाबत विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा ग्रामविकास निधीची माहितीही समितीसमोर मांडली जाणार असून, त्यावर चर्चा करून मंजुरी देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
Post Views: 10