माढा – विठ्ठल प्रतिष्ठान, निमगाव (टें) संचलित आर्या पब्लिक स्कूल, माढा येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय टेंग सू डो क्रीडा स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय बुलढाणा व जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यातील आठ विभागांमधून तब्बल ३८४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत १४ वर्षाखालील गटामध्ये शौर्य नवनाथ तांबिले याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अश्वतेज सुनील चौगुले याने द्वितीय क्रमांक, तर सूर्या शरद सुरवसे आणि विराज राजेश वेळापुरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
१७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये आर्या शरद सुरवसे हिने द्वितीय क्रमांक, तर आर्या हरिश्चंद्र शिरतोडे हिने तृतीय क्रमांक मिळवला.
१७ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये ओम सोमनाथ गोरे याने द्वितीय क्रमांक, तर आर्यन ब्रह्मदेव धायगुडे याने तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढवला.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. शुभम पुरवत यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. त्यांच्या परिश्रमामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मा. आमदार बबनदादा शिंदे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन मा. रणजीत शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे, प्राचार्य थोरात एस. जे., कार्यालयीन अधीक्षक संभाजी पाटील तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे परिसरात शाळेचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

















