सोलापूर -सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका हा महिला आणि मुलींना बसणार आहे. कारण या काळात कामाचा सर्वाधिक भार हा महिलांवर पडतो.पाण्याचा ताण,मोलमजुरी,अन्नधान्याची टंचाई, उपासमार त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक ताणतणाव याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो म्हणून या काळात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत स्त्री आरोग्य विषयक अभ्यासक व ज्येष्ठ कार्यकर्त्या मेधा काळे यांनी व्यक्त केले.
सोलापुरात अस्तित्व संस्था व सपोर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात “दुष्काळाचे महिला व मुलींच्या आरोग्यावर होणारे परिणाम व उपाय योजना”या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन केले होते त्यावेळी त्या महिलाना मार्गदर्शन करताना बोलत होत्या, यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या उद्घाटक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरिता मोकाशी,चर्चासत्राच्या अध्यक्षा सपोर्ट फाऊंडेशन च्या अध्यक्षा रेश्मा कदम, रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या अध्यक्षा डॉ नयना व्यवहारे, निशा भोसले, अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे उपस्थित होते.
पुढे बोलताना मेधा काळे म्हणाल्या की, महिलांनी ताणतणावातून मुक्त होण्यासाठी स्वतःच्या आवडी निवडून त्यात काही वेळ रमले पाहिजे. स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे त्यांनी सुरुवातीला महिलाना मानसिक व शारीरिक समस्यांची एक प्रश्नावली भरायला दिली त्यातून महिलांच्या अनेक समस्या पुढे आल्या त्यावर त्यांनी खुली चर्चा घडवून आणली.
दुसऱ्या वक्त्या डॉ नयना व्यवहारे यांनी महिलांनी दुष्काळी स्थितीत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेताना आहारसंबंधी मार्गदर्शन केले. केळी,आंबड्याची, राजगी-याची भाजी आरोग्यासाठी किती महत्वाची आहे हे पटवून सांगितले,वाळ्याचे पाणी आरोग्यदायी आहे हे पटवून देताना त्यांनी मासिक पाळीत घ्यावयाची काळजी व मासिक पाळी बाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी चर्चासत्राच्या उद्घाटक सरीता मोकाशी, निशा भोसले यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहाजी गडहिगरे यांनी केले. त्यांनी दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या चर्चासत्रामागची भूमिका सांगितली.
अध्यक्षीय मार्गदर्शन रेश्मा कदम यांनी केले त्यांनी सांगितले दुष्काळी स्थितीत सपोर्ट फाऊंडेशन व अस्तित्व संस्थांच्या वतीने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सतत महिलाना मार्गदर्शन करून त्यांना जागरूक करू. सपोर्ट फाऊंडेशन कौशल्य विकास प्रशिक्षणातून महिलाना सक्षम व स्वावलंबी कसे करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियेत महिलांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले चर्चासत्रात सोलापूर शहर व ग्रामीण भागातून 150 महिला सहभागी होत्या.
चर्चासत्राचे सूत्रसंचलन सपोर्ट फाउंडेशनच्या प्रकल्प संघटक पल्लवी वडणे यांनी केले तर आभार कौशल्य विकास प्रकल्पाच्या समन्वयक सुवर्णा वाघमारे यांनी मानले.
Post Views: 47